देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव बाजारपेठ येथे ट्रॅफिक मुळे झालेल्या हाणामारीत आठजणां वर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत ही घटना १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता शिरगाव बाजारपेठ येथे घडली.
येथे ट्रॅफिकच्या कारणातून झालेल्या वादावादीचे पर्यावसन मारामारीत होवून शिरगाव बाजारपेठ येथिल दिपक गोविंद तावडे (६५) यांना प्लॅस्टिक खुर्चीने, हाताने, दगडाने, दांड्याने व मातीच्या कुंडीने त्याचा घरात घुसून मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी शिरगाव येथीलच आठजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसां कडून मिळालेल्या माहितीनूसार, शिरगाव बाजारपेठे येथे राहत असलेले दिपक गोविंद तावडे(६५) आणि शिरगाव येथेच राहणारे संकेत चव्हाण(२५) यांची बाजारपेठेतच ट्रॅफिकच्या कारणावरून वादावादी होवून दोघांनीही एकमेकांना हाताच्या थापटाने मारहाण केली होती.त्यानंतर संकेत चव्हाण यांनी आपल्यासमवेत संतोष चव्हाण(२४), सोनू मोंडकर(२८), ओंकार मोंडकर(३०), प्रमोद चौकेकर(३५), संतोष शेट्ये(३२), आर्यन दर्जी(२२), श्रेयस श्रीगरे(२६) या सातजणांना १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता दिपक गोविंद तावडे यांच्या घरी नेले.यातील आर्यन दर्जी यांने तावडे यांना त्यांचा घरातील खुर्चीने मारहाण केली तर संकेत चव्हाण, संतोष चव्हाण, सोनू मोंडकर व ओंकार मोंडकर या चौघांनी घराच्या बाजुला असलेल्या लाकडी दांड्याने मारहाण केली व प्रमोद चौकेकर, संतोष शेट्ये आणि श्रेयश श्रीगरे या तिघांनी मातीची कुंडी व दगडाने मारल्याने तावडे यांच्या उजव्या हाताच्या तळव्याला व डाव्या पंजावरील भागाला दुखापत झाली.याप्रकरणी त्यांनी देवगड पोलिस स्थानकात मारहाण केल्याची फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी संकेत चव्हाण याच्यासहीत सातजणांविरूध्द भारतीय न्याय संहिता ११८(१), १८९(२), १९१(२), १९०, १३१ ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पो.हे.कॉ.महेंद्र महाडिक या अधिक तपास करत आहेत.
ट्रॅफिकवरून किरकोळ वाद हाणामारीपर्यंत
पाण्याचा अंदाज नसताना समुद्रात गेली; २२ वर्षांची तन्वी जीव गमावून बसली
दापोली : पुणे येथून पर्यटनासाठी आंजर्ले येथे आलेल्या एका महिला पर्यटकाचा समुद्रात पोहण्यासाठी गेले असताना बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी 4.30 चे सुमारास घडली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथून 12 जणांचा एक ग्रुप आज पहाटे 4 वाजता आंजर्ले येथे पर्यटनासाठी जाण्यासाठी निघाला. ते 11 वाजता आंजर्ले येथे पोचले. तेथील एका रिसॉर्ट वर त्यांनी नाष्टा केला व 4 वाजण्याच्या सुमारास ते पोहण्यासाठी सममुद्राच्या पाण्यात गेले. पोहत असताना एक मोठी लाट आली व त्या लाटेत या ग्रुपमधील तन्वी निलेश पारखी वय 22, रा. विश्रांती वाडी पुणे दिसेनाशी झाली, त्यावेळी सोबत असलेल्या मित्रानी किनाऱ्यावरील ग्रामस्थांना माहिती दिल्यावर ग्रामस्थांनी पाण्यात बुडालेल्या तन्वीला पाण्याबाहेर काढून किनाऱ्यावर आणले मात्र तन्वी बेशुद्ध पडली होती. तिला उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले होते, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. दापोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरु आहे.
या घटनेमुळे आंजर्ले परिसरात खळबळ उडाली आहे.
आईने घट्ट मिठीत घेतलं; स्वतः गंभीर बाळाला वाचवलं
वेंगुर्ले : वेंगुर्ताले लुक्यातील तुळस घाटी येथे वेंगुर्लेच्या दिशेने जाताना रिक्षाचे ब्रेक फेल होऊन रिक्षा पलटी झाली. यात असलेल्या १० महिन्याच्या बाळाच्या आईला गंभीर दुखापत झाली असून तिला वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गोवा- बांबुळी येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर त्या महिलेच्याच हाती असलेल्या बाळाला त्या महिलेने घट्ट पकडल्यामुळे बाळ सुदैवाने बचावले असून सुखरूप आहे.
हा अपघात आज (९ मे) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तुळस घाटी येथे घडला. तुळस मार्गे वेंगुर्ले येथे जाताना तुळस घाटावरील तीव्र उतारावर वेंगुर्ले हद्दीत असलेल्या वळणावर रिक्षाचे ब्रेक फेल होऊन रिक्षा पलटी झाली. या अपघातात रिक्षाचालक रुपेश सावळाराम माडकर रा. दाभोली यांच्यासहित ऋतुजा राजू कुडाळकर वय २६ , रोहन राजू कुडाळकर वय ५ वर्षे (दोन्ही राहणार कोलगाव), आराध्या आदेश साळगावकर वय
२८ व कमलाकांत उर्फ रुवंश आदेश साळगावकर वय ५ महिने दोन्ही राहणार वायंगणी हे जखमी झाले. दरम्यान यात रुवंश या ५ महिन्याच्या बाळाची आई आराध्या साळगावकर हिला गंभीर दुखापत झाल्याने तिला गोवा- बांबुळी येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर तिच्या हाती असलेला तिचा ५ महिन्याचा मुलगा सुखरुप आहे. उर्वरित जखमींवर वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघात झाल्यानंतर जखमींना सुमारे १ तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्याठिकाणी आलेले सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावडे व भूषण आंगचेकर यांनी येथील प्रसाद मराठे यांच्या खासगी गाडीत जखमींना घालून वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
१ रुपया घेऊन तपासणारे खानोलकर डॉक्टर
आठवण!
…..
काल रविवार. माझा पेशन्ट बघण्याचा दिवस. एरवी देखील अपाॅईमेंट देऊन मी पेशन्ट बघत असलो तरी माझ्या कुमारवयीन मुलांसोबतच्या आणि काही संस्थांसोबतच्या कामामुळे मला इतर दिवशी पेशन्टना द्यायला खूपच कमी वेळ मिळतो. पण रविवारी मला बर्यापैकी वेळ असतो.
काल दुपारीदेखील माझ्याकडे पेशन्ट होते. काल संध्याकाळच्या शेवटच्या पेशन्टला मी तपासले. ती सुमारे सत्तर वर्षांची, आमच्या शेजारच्या गावची, नऊवारी साडी नेसलेली, आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याचे तिच्या एकंदरीत पेहरावावरुन लक्षात येणारी, निरक्षर बाई होती. मी तिला प्रिस्क्रीप्शन लिहून दिले. ती पहिल्यांदाच माझ्याकडे आली होती. त्यामुळे मी फी घेत नाही हे तिला माहीत नव्हते. तिने फी विचारताच ‘मी फी घेत नाही’ म्हणालो. त्यावर क्षणाचाही विलंब न करता ती म्हणाली, ‘खानोलकर डाॅक्टर असेच होते. ते आमच्या लोकांकडून फी घेत नसत!’ मला बघून तिला डाॅ.खानोलकरांची आठवण आली, हे पाहून आयुष्यातलं सर्वात मोठं समाधान मिळाल्याची भावना मनात आली. सर्वात मोठा पुरस्कार मिळाल्याची भावना म्हणाना. जी बांदा परिसरातील मंडळी आहेत आणि ज्यांना सुमारे अठ्ठावीस वर्षांपूर्वी दिवंगत झालेले डाॅ.खानोलकर माहीत आहेत त्यांना मला असे का वाटले ते समजायला कठीण जाणार नाही.
लहान असताना मी स्वतः डाॅ.खानोलकरांकडे पेशन्ट म्हणून अनेकदा गेलो आहे. माझ्या घरात त्यांचा उल्लेख ‘आमचे डाॅक्टर’ असाच होई. ‘डाॅक्टर’ म्हटले की ‘डाॅ.खानोलकर’ असेच समीकरण माझ्या मनात घट्ट बसलेले होते. बहुधा बांद्यातील किमान माझ्या वयाच्या सर्वच लोकांच्या मनात असेच समीकरण असेल.
डाॅ.खानोलकर हे १९४२ ला बांद्यात आले. तेव्हापासून मृत्यूच्या एक वर्ष आधीपर्यंत म्हणजे १९९६ च्या डिसेंबरपर्यंत ते आमच्या गावात प्रॅक्टिस करीत होते. शेवटच्या वर्षात स्ट्रोकमुळे अंथरुणाला खिळल्यामुळे ते पेशंट तपासू शकले नाहीत. अक्षरशः ‘रुग्णसेवा’ हे ध्येयच मनाशी बाळगून त्यांनी आयुष्यभर प्रॅक्टिस केली. आयुष्यभर खादीची शाॅर्ट व इन केलेला खादीचाच शर्ट याच पेहरावात ते वावरले. नेहमी हसतमुख चेहरा. रुग्णाला आश्वस्त करणे म्हणजे काय याचे ते मूर्तिमंत उदाहरण. किमान ऐशी- नव्वद पेशन्ट दिवसाकाठी तपासून देखील ते त्रासलेत, कंटाळलेत असे कधी कोणी पाहीले नाही. आयुष्यात ते कधी कोणावर चिडले असतील असे बिलकुल वाटत नाही. संत एकनाथांचे चरीत्र वाचताना नाथांची न चिडणारी वृत्ती म्हणजे काय असेल, असा विचार करता माझ्या डोळ्यासमोर डाॅ.खानोलकरच येत असत.
गावातील सर्वांचेच ते फॅमिली डाॅक्टर होते म्हणा ना. मी आज सायकीयॅट्रीस्ट म्हणून जे काम करतो, ते त्यांनी फॅमिली डॉक्टर म्हणून आयुष्यभर केले. माझे कुटुंब (अगदी माझ्या आजीआजोबांपासून) घरातल्या अनेक गोष्टीत त्यांचे मार्गदर्शन घेत. आणि न कंटाळता, कोणालाही न टाळता हा माणूस सर्व ऐकून घेऊन चर्चा करी. डाॅक्टर म्हणून दिवसाकाठी किमान पाऊणशे पेशंटना तपासणे आणि संध्याकाळी निवांत बसण्याऐवजी एकदोन पेशंटांच्या घरगुती विषयातही मार्गदर्शन करणे, ते कसे साधत कोण जाणे. शिवाय सायकलने पेशंटच्या घरी जाऊन अंथरुणावर खिळलेल्या पेशंटना व्हिजिटही देत.
हा माणूस पेशन्टांकडून केवळ एक रुपया फी घेई आणि दलितांना पूर्ण मोफत. ती बाईने म्हटलेल्या ‘आमच्या लोकांकडून ते फी घेत नसत’ त्या वाक्याचा अर्थ दलितांकडून प्रॅक्टिसच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी फी घेतली नाही. खादीप्रमाणे हरीजनसेवा हे व्रत घेऊनच ते बेचाळीस साली बांद्यात आले होते.
बाकीच्यांकडून देखील त्यांनी कितीशी फी घेतली? आयुष्यात स्वतः कधी जमीन विकत घेऊ शकले नाहीत, ना स्वतःचे घर बांधू शकले. विरंगुळ्यासाठी ते कुठे फिरायला गेल्याचे मी ऐकले नाही.
पण त्यांच्या जाण्यानंतर आज अठ्ठावीस वर्षांनी त्यांची आठवण जर एका निरक्षर बाईला उत्स्फूर्त होत असेल आणि त्यांच्याबाबतचा कृतज्ञ भाव तिच्या डोळ्यात दिसत असेल, तर त्याच्याशिवाय मोठे कर्तृत्व ते कोणते?
आज आमच्या आजूबाजूला डाॅ.खानोलकरांसारखी करुणामय माणसे दुर्मीळ झाली आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बदमाशांचीच होर्डिंग्ज नजरेसमोर येत आहेत. याचा परिणाम माणसाच्या चांगुलपणावरचा आमचा विश्वास उडण्यात होत आहे. तुम्ही कोणाशीही बोला. ‘आजकाल चांगले राहून चालत नाही’ असा सल्ला देणारी माणसे तुम्हाला मिळतील. स्वतःपलिकडे जाऊन गांजलेल्याला मदत करण्याचे सोडाच, स्वतःपलिकडे जाऊन गांजलेल्यांना मदत करा, असे गप्पात सुद्धा लोकांना बोलावेसे वाटत नाही. अशा पराकोटीच्या आत्मकेंद्रित काळात जेव्हा डाॅ.खानोलकरांसारख्यांची आठवण निघते, तेव्हा ते स्मरण माझ्यासारख्याच्या मनासाठी गंगाजलाने आंघोळ करण्यासारखे वाटते!
…..
डॉ. रुपेश पाटकर
प्रसाद आईला दिलेला शब्द नाही पाळू शकला ; अर्ध्यावरचं जगाचा निरोप घेतला
दोडामार्ग : दोडामार्ग विजघर मार्गावर कुडासे तिठा येथे खडी वाहतूक करणाऱ्या डंपरने मोर्ले येथील प्रसाद तुकाराम कांबळे, वय 27 या युवकाचा बळी घेतला आहे. मात्र अपघाताचा पंचनामा करण्याअगोदरच डंपर मालकाने गाडी घटनास्थळावरून हलवण्याची मुजोरी केली आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांना धारेवर धरत जाब विचारला. यावेळी मोर्ले गावातील तसेच तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या जमा झाले. विशेष म्हणजे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी असून सुद्धा त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित झालंय.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोर्ले येथून आपल्या घराकडून सकाळी गोवा येथे कामाला जाण्यासाठी प्रसाद कांबळे हा युवक भेडशी मार्गे गोव्याला जायला निघाला. तो कुडासे तिठा येथे पोहचला असता त्याच्या समोर खडी वाहतूक करणारा डंपर चालक होता. अचानक खडी वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने गाडी डाव्या बाजूला वळविली. डंपरला साईड लाईट नसल्याने पाटीमागून असणाऱ्या प्रसादला काहीच समजले नाही.
त्यामुळे पाठीमागून असणाऱ्या दुचाकीस्वार प्रसाद कांबळे याची दुचाकी डंपरच्या मागच्या टायर खाली पडली. त्यावेळी पाठीमागचे चाक प्रासादच्या पोटावर चढले. आणि तेथेच तो गंभीर जखमी झाला. यावेळी घटनास्थळी आलेल्या मोर्ले गावचे सरपंच संजना धुमास्कर व उपसरपंच संतोष मोर्ये, मदन राणे यांनी खासगी गाडीत घालून त्याला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. यावेळी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून तो गंभीर जखमी असल्याने गोवा येथील बांबोळी येथे पाठविण्यात आले. त्यानंतर घटना स्थळी पुन्हा जमलेल्या मोर्ले ग्रामस्थ आणि डंपर चालक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी उपस्थित दोडामार्ग पोलिसांनाही ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. अपघात घडला असताना अपघाताचा पंचनामा करण्याअगोदर अपघात ग्रस्त वाहने कोणाच्या सांगण्यावरून हलविण्यात आली. या प्रश्नावर पोलिस निरुत्तर झाले. यावेळी आक्रमक ग्रामस्थांनी दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात जमा करा आणि संबंधित वाहन चालक आणि मालकावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. यावेळी मोर्ले सरपंच संजना धुमास्कर, उपसरपंच संतोष मोर्ये, गोपाळ गवस, पंकज गवस, प्रथमेश गवस व इतर ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी दोडामार्ग पोलीस पीएसआय आनंद नाईक, गजानन मळगावकर यांनी दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात आणली.
आज गुरुवारी सकाळी जिल्हा वाहतूक पोलीस दोडामार्ग विजघर मार्गावर कुडासे तिठा येथे वाहनांची तपासणी करण्यासाठी आले होते. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ते वाहतूक पोलीस ज्या ठिकाणी उभे होते त्याच ठिकाणी हा अपघात घडला. यावेळी त्या ठिकाणी असलेले वाहतूक पोलीस जानू बोडेकर, भोगले, झापू पवार या पोलिसांनी वाहने पंचनामा करेपर्यंत तिथे थांबून जखमीला मदत कार्य करण्याची गरज होती. मात्र असे न करता फक्त फोटो काढण्याचे काम केले. या अपघातात आमचा काही विषय नाही ते दोडामार्ग पोलीस बघतील असे सांगून व पोलीस पंचनाम करण्यात अगोदरच ही वाहने बाजूला करून घटना स्थळवरून पलायन केले.
पोलिसांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
दरम्यान अपघातस्थळी असलेल्या जिल्हा वाहतूक पोलिसांनी कोणतीही मदत कार्य किंवा कठोर भूमिका न घेता तेथून पळ काढल्याने मोर्ले ग्रामस्थ आक्रमक झाले. मग हे पोलीस या ठिकाणी कशासाठी आले होते ? मदत कार्य किंवा आपले कार्य विसरून ते फक्त पैसे गोळा करण्यासाठी आले होते काय ? असा सवाल ग्रामस्थांनी केला. संबंधित जानू बोडेकर, भोगले, झापू पवार या पोलिसांवर जिल्हा पोलीस निरीक्षक सौरभकुमार अग्रवाल कारवाई करणार काय ? यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
गोवा कला अकादमीत होता शिक्षक
प्रसाद हा जन्मल्यापासून लगतच्या गोवा राज्यातच शिकायला होता. शिक्षण घेत असताना संगीत या विषयाकडे जास्त भर दिला. कॉलेज झाल्यावर त्याने गायन, पेटी, तबला ही वाद्य शिकला. तो गोव्यात उत्कृष्ट गायक म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर तो गोवा येथील कलाअकादमी येथे संगीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिक्षण देत होता. आज तो आपल्या मुळ गावी मोर्ले येथून गोव्याला जातं असताना त्याच्यावर काळाने घाला घातला आणि त्याचे संगीत सूर इथेच थांबलेत. त्याच्या पश्चात आई – वडील, 3 भाऊ, 3 बहिणी असा परिवार आहे.
‘आई घाबरू नकोस, मी येणार नक्की!’
प्रसादला जखमी अवस्थेत पाहून आईचे काळीज पिळवटून गेले. तिने तिथेच हंबरडा फोडला, पण जाता, जाता स्ट्रेचरजरून प्रसादने तिचा हात हातात घेतला, आणि म्हणाला, ‘आई घाबरू नकोस, मी येणार नक्की!’ हे शब्द कानी पडलेल्या रुग्णालयातील कर्मचार्यांचे डोळेही पाणावले. रुग्णालयातील तो आई आणि लेकराचा शेवटचा संवाद ठरला. कंठातला स्वर स्तब्ध झाला, अन् विणेच्या ताराही क्षणभर कंप पावल्या. निधनाची बातमी येताच मोर्ले गावातील या युवा कलाकारासाठी प्रत्येक जण हळहळला. जणू मृत्यूही ओशाळला!
अपघातानंतर नातलगांसह स्थानिक ग्रामस्थांचा उद्रेक वाढला. त्यांनी थेट पोलीस ठाण्याला धडक दिली. अपघातावेळी खडी भरलेला डंपर वाहतूक पोलीस असताना देखील कसा काय खाली होतो ? असा उद्विग्न सवाल ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांना विचारला. तसेच डंपर चालकावर गंभीर गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी निसर्ग ओतारी यांनी होकार दर्शविला. सायंकाळी उशिरापर्यंत जाब जबाब नोंदवण्याचे प्रक्रिया सुरू होती.
चक्क कोलकात्यात साजरा झाला सावित्री उत्सव
कोलकाता : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक ४ जानेवारी रोजी संध्याकाळी कोलकात्यात सावित्री उत्सव साजरा केला गेला.
नुकतेच महाराष्ट्रातून कोलकाता मध्ये शिफ्ट झालेल्या निशा फडतरे व सचिन थिटे यांनी कोलकाता मधील उल्टाडांगा परिसरातील महाराष्ट्रीय कुटुंबांना एकत्र बोलावून सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचे स्मरण करण्याच्या हेतूने हा उत्सव आयोजित केला होता. यामध्ये सावित्री जोती यांनी केलेले कार्य रंगीबेरंगी पताकांवर लिहून सावित्रीबाई, जोतिबा, फातिमा व जिजाऊ यांच्या प्रतिमासह भिंतीवर चिकटविण्यात आले. महिलांनी सावित्रीबाईंचे प्रतिक म्हणून कपाळावर आडवी चिरी लावली. दाराबाहेर सावित्रीबाईंची प्रतिमा रांगोळीतून रेखाटली गेली. शेजारी दिवा लावला गेला. लहान मुला-मुलींनी सुद्धा साऊ जोतिबाचा पेहराव केला. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या पुस्तिका सर्व उपस्थितांना वाटण्यात आल्या. त्यानंतर सावित्रीबाई व जोतीबा फुले यांच्या कार्याबद्दलची सविस्तर माहिती सर्व उपस्थितांना देण्यात आली. उपस्थितांनी आपापली मनोगते व्यक्त करून सावित्रीबाई व जोतीबा यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले. सावित्रीची गाणी, ओवी गायल्या गेल्या व त्यानंतर रात्री सर्वांचे स्नेहभोजन झाले. साधारण तीस जण सहकुटुंब यात सहभागी झाले होते.
निशा सचिन यांनी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले.
साऊ-जोती यांनी समाजासाठी केलेल्या महान कार्याचा वारसा जपणे, त्याची आठवण ठेवणे व हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचवणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे निशा फडतरे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी:-
सचिन (8424041159)
सावंतवाडीच्या सुपुत्राने रत्नागिरीला जिंकून दिली MPL ट्रॉफी! निखिल नाईकच्या कामगिरीमुळे ‘रत्नागिरी जेट्स’ने घवला इतिहास…
आता इतिहास घडेल असं म्हणत रत्नागिरी जेट्स संघाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या MPL स्पर्धेत खरंच इतिहास घडवला. महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सलग दुसऱ्यांदा रत्नागिरीचा संघ विजेता ठरला. शनिवारी रात्री झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीनं नाशिकचा पराभव केला आणि विजेतेपदावर नाव कोरलं. रत्नागिरीच्या या कामगिरीत सावंतवाडीवाडीचा सुपुत्र आणि महाराष्ट्राचा रणजीपटू निखिल नाईकचं योगदान मोलाचं ठरलं.
आयपीएल, रणजी अशा मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव असलेल्या निखिलनं MPL मध्येही आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला. यंदाच्या सीझनमध्ये त्याने 12 सामन्यात 270 धावा फटकावल्या. तर यष्टीरक्षक म्हणूनही कमालीची कामगिरी बजावली. त्याची हीच कामगिरी रत्नागिरीच्या विजयात मोलाची ठरली.
पुण्याच्या गहुंजेतील MCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात रत्नागिरीनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 बाद 160 धावा केल्या होत्या. निखिलनं हाणामारीच्या षटकात मैदानात उतरत अवघ्या 25 चेंडूत नाबाद 36 धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरीला दीडशेचा टप्पा पार करता आला. त्यानंतर नाशिकच्या संघाला 136 धावांपर्यंतच मजल मारता आली. आणि रत्नागिरीनं हा सामना 24 धावांनी जिंकून 2023 आणि 2024 आशा दोन्ही सीझनमध्ये ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम गाजवला. निखिलसह रत्नागिरीच्या संघातील कर्णधार अझीम काझी, फिरकीपटू सत्यजीत बच्छाव, धीरज फटांगरे, दिव्यांग हिंगणेकर, प्रीतम पाटील, प्रदीप दाढे यांचं योगदानही महत्वाचं ठरलं.
दरम्यान गेल्या वर्षी MPL च्या पहिल्या सीझनआधी झालेल्या लिलावात रत्नागिरीनं निखिलसाठी 3.5 लाखांची घासघशीत बोली लावली होती. पहिल्या सीझनमध्ये चॅम्पियन झाल्यावर रत्नागिरी फ्रँचायझीनं निखिलला यंदा रिटेन केलं होतं. हाच विश्वास सार्थ ठरवताना निखिलनं यंदाही धडाकेबाज परफॉरमन्स देत आपल्या संघाला थेट विजेतेपदापर्यंत नेलं.
वेल डन निखिल नाईक…!!
कणकवली अपघातात वैभववाडीतील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
वैभववाडी: कणकवली पियाळी पुलाननजीक झालेल्या अपघातात वैभववाडी तांबेवाडी येथील पोलीस कर्मचारी अभि तांबे यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पहाटे ३वाजण्याच्या सुमारास झाला.या घटनेने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
अभि तांबे हे शुक्रवारी रात्री वैभववाडीतील मित्रांसोबत एका पोलिस मित्राच्या वाढदिवसानिमित्त ओरोस येथे गेले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून पहाटे माघारी फिरत असतानाच पियाळी पुलाननजीक तांबे यांचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी थेट रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. यामुळे तांबे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच सोबत असलेल्या रुपेश साळवी व प्रतिक बेळेकर यांना गंभीर दुखापत झाली.
अभि तांबे हे सिंधुदुर्ग जिल्हा महामार्ग वाहतूक पोलीसमध्ये सेवा बजावत होते. त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच मित्र परिवाराने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. तांबे यांच्या निधनामुळे संपूर्ण वैभववाडी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात | एकाचा मृत्यू
कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर नांदगाव – पियाळी पुलावर शनिवारी ( आज ) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कारचा अपघात होऊन महामार्ग केंद्र, कसाल येथे नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस हवालदार यशवंत उर्फ (अभिजित) भास्कर तांबे वय 45 राहणार वैभववाडी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
तांबे हे कसाल येथून आपल्या वैभववाडी गावी जात असताना पियाळी पुलावर आल्यावर त्यांच्या ताब्यातील कार क्रमांक ( एमएच १२ केएस १२९९ ) महामार्गावरील डिव्हायडरला आदळली. यामध्ये कारचा समोरील भागाचा चक्काचूर झाला होता. यात त्यांचा मृत्यू झाला.
तसेच सोबत असणारे रूपेश विकास साळवी (वय -33 रा. वैभववाडी) व प्रवाशी प्रतीक सोनू बेळेकर (वय – 28 रा. वैभववाडी) यांना गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना उप जिल्हा रुगणालय कणकवली या ठिकाणी अधिक उपचाराकरा करिता पाठविण्यात आले. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती समजतात कणकवली पोलीस आणि वाहतूक पोलीस यांनी धाव घेत मदत कार्य केले.
भुईबावडा घाटात कोसळली दरड..!
वैभववाडी:भुईबावडा घाटात दरड कोसळली असलेल्याची माहिती मिळतेय. पहिल्याच पावसात हा प्रकार घडलाय. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.यामुळे घाटातील वाहतूक विस्कळित झाली आहे.सध्या घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे.