Homeब्लॉगपावणारी देवता..!

पावणारी देवता..!

डॉ. रुपेश पाटकर : ही अडीच हजार वर्षापूर्वीच्या ग्रीस रोममधील गोष्ट आहे. म्हणजे ही गोष्ट आताची नाही आणि आपल्या इथली देखील नाही. रोम जवळील एका टेकडीवर एका देवतेचे जागृत देवस्थान होते. लांबलांबचे लोक तिथे नवस करायला येत. त्यांचा नवस फळाला आला की नवस करणारी व्यक्ती त्या देवतेच्या दर्शनाला येई आणि तिथल्या एका मोठ्या खोरणात एक मातीचा घोडा अर्पण करून जाई. एकदा एक तत्त्ववेत्ता त्या देवतेच्या दर्शनाला आला. तिथल्या पुरोहिताने त्याला देवतेचा महिमा सांगितला आणि देवता किती जागृत आहे, ती नवसाला कशी पावते वगैरे वर्णन करून त्याचा पुरावा दाखवायला तो त्याला नवस फेडताना मातीचे घोडे अर्पण केलेल्या खोरणापाशी घेऊन आला. तिथे असंख्य लहान लहान मातीचे घोडे ठेवलेले होते. त्यांच्याकडे बोट दाखवत त्याने त्या तत्त्ववेत्याच्या चेहर्‍याकडे पाहिले. त्याला वाटले की जसे सगळे भाविक ती मातीच्या घोड्यांची रास पाहून भरवून जातात तसाच हा तत्त्ववेत्तादेखील भरावेल. पण तो तत्त्ववेत्ता आश्चर्यचकित होण्याऐवजी विचारात गढून गेल्यासारखा वाटला.

तो त्या पुरोहिताला म्हणाला, “गुरुजी, ज्यांच्या नवसाला ही देवता पावली नाही, त्यांनी नवस फळला नाही, याची खूण म्हणून काही इथे ठेवले असते तर….?” पुरोहित भांबावून गेला.

तेव्हा तो तत्त्ववेत्ता म्हणाला, “तुमच्या खोरणातील मातीचे घोडे नवस फळलेल्यांची संख्या सांगतात. ज्यांचे नवस फळत नाहीत. ते इथे येत नाहीत. ते स्वतःच्या नशिबालाच दोष देत राहतात. अशा नवस न फळलेल्या लोकांची संख्या किती? जेव्हा दोघांची तुलना होईल तेव्हाच तुमची देवता जागृत आहे की नाही हे सांगता येईल.” तो पुरोहित खजील होऊन निघून गेला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments