हा लेख मी २००२ च्या जानेवारीत लिहीला होता. तेव्हा माझे पदव्युत्तर शिक्षण चालू होते. प्रत्यक्ष सामाजिक कामाचा अनुभव नव्हता. महात्मा गांधीचे साहित्य वगळता मी काहीच वाचले नव्हते. आज या लेखाला बावीस वर्षे झालीत. पण तरीही बावीस वर्षापूर्वी लिहीलेला हा लेख मला आजही जशाच्या तसा शेअर करावासा वाटतोय. किंबहुना आज त्याचे अधिकच महत्व जाणवतेय.)…..माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक असल्याने माझ्या लहानपणी आमच्या घरात गांधी आणि गांधीवाद याविषयी पूज्यभाव होता. साहजिकच मलाही त्याकाळात गांधी पूज्य वाटत. पण त्यांच्याविषयी वाचायला किंवा ऐकायला मला मुळीच रस वाटत नसे. आणि रस वाटावा तरी का? ना त्यांच्याकडे आकर्षक चेहरा होता, ना नाट्यमय प्रसंगांनी भरलेलं चरित्र होतं. होत्या फक्त नेहमी ऐकून बोथट झालेल्या दोन संकल्पना- सत्य आणि अहिंसा. गांधींनी त्यांची केलेली पराकाष्ठा म्हणजे मूर्खपणाच वाटे. चरखा चालवणं, कचरा काढणं, उपासतापास यांनी का कधी स्वातंत्र्य मिळतं? एवढी मोठी ब्रिटिश साम्राज्यशाही यांच्या मूठभर मीठ उचलण्याने थोडीच हल्ली असणार? माझ्या मनात त्याकाळात नेहमीच हे प्रश्न असत. पण ज्याअर्थी माझ्या घरातील मोठी माणसे त्यांना पूज्य मानतात, त्याअर्थी मी पण त्यांना पूज्य मानले पाहीजे, असे मी माझ्या मनाला समजावत असे. थोडक्यात, गांधीजींविषयीचा त्याकाळातील माझा पूज्यभाव आंधळा होता.
जसजसा मी मोठा होऊ लागलो व बाहेरच्या जगाशी माझा संबंध वाढू लागला तसतशी माझ्या मनातील गांधींविषयीची प्रश्नचिन्हे वाढत गेली. वैचारिक प्रगतीपुढे आंधळा पूज्यभाव कमकुवत होऊ लागला.
काॅलेजात जाईपर्यंत शालेय अभ्यासक्रमातील गांधींविषयीची माहीती वगळता मी त्यांच्याविषयी काहीही वाचले नव्हते. काॅलेजात असताना परीक्षेच्या काळात अभ्यासात विरंगुळा म्हणून आणि विरंगुळ्यासाठी दुसरे काही उपलब्ध नसल्याने नाईलाजाने पहिल्यांदाच मी ‘सत्याचे प्रयोग’ वाचले. त्या वाचनाने माझ्या मनातला गांधींविषयीचा नकारात्मक भाव कमी झाला नाही, पण ह्या अफलातून व्यक्तीविषयी कुतूहल मात्र निर्माण झाले. माझ्या मनात त्यांच्याबद्दलच्या प्रश्नांची संख्या आणखी वाढली आणि त्यासोबत त्यांची उत्तरे शोधण्याची जिज्ञासादेखील वाढली. गुजरातेतील एका दिवाणाचा सामान्य बुद्धीचा, भित्र्या बुजऱ्या स्वभावाचा, तुमच्या माझ्यासारखाच सामान्य मुलगा, ज्याला सभाधीटपणाच्या अभावी एक साधा खटला चालवता आला नाही, तो नोकरीच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेला गेला आणि वीस वर्षांनी लोकमान्यांचा उत्तराधिकारी होण्याची ताकद घेऊन आला. ही गोष्ट मला आश्चर्याची वाटू लागली. या व्यक्तीकडे प्रभावी व्यक्तिमत्त्व नव्हते, प्रभावी वक्तृत्व नव्हते, लोकात आवेश, भावनिक उन्माद निर्माण होईल असे प्रभावी विचारही नव्हते. तरीही तो दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांचा नेता बनला. त्याच्या सत्य अहिंसेच्या सकृद्दर्शनी मूर्खपणा वाटणार्या आत्मक्लेशदायी तत्त्वज्ञानावर त्याच्या दक्षिण आफ्रिकेतील अनुयायांनी विश्वास ठेवून हाल भोगले आणि एवढेच नव्हे तर जनरल स्मटस्सारख्या खंद्या लढवय्याने या निशस्त्र निरुपद्रवी लोकांपुढे हार मानली.
मी पुन्हा जाणीवपूर्वक ‘सत्याचे प्रयोग’ वाचून काढलं. मला गांधींविषयी थोडीशी जवळीक वाटू लागली. तरीही त्यांचं सत्यअहिसेचं तत्वज्ञान मला पचत नव्हतं. माझा निशस्त्र प्रतिकारावर विश्वास बसत नव्हता. एखाद्या ठिकाणी, एखाद्या वेळी, एखादा हुकूमशहा भावनाविवश होऊ शकतो असा माझा गांधींच्या आफ्रिकेतील विजयाविषयीचा निष्कर्ष होता. पण माझे मन मात्र गांधींचा सतत विचार करत राहीले. त्याचे आणखी एक कारण त्यांच्याविषयी अल्बर्ट आईनस्टाईन यांनी व्यक्त केलेले मत हेदेखील होते. आईनस्टाईन म्हणाले होते की भविष्यात येणाऱ्या पिढ्यांचा गांधींसारखा हाडामासाचा माणूस या पृथ्वीवर साक्षात होऊन गेला यावर विश्वास बसणार नाही एवढे गांधींचे कार्य अलौकिक आहे.
हळूहळू माझ्या लक्षात येत गेले की गांधींनी आपल्या नव्या नीतीने केवळ जनरल स्मट्सलाच भावनाविवश केले, असे नाही. आयुष्यभर ते अनेक लढाया याच नीतीने लढले. चंपारण, खेडा, अहमदाबादचा मजूरांचा प्रश्न इत्यादी प्रत्येक प्रश्नात त्यांनी निशस्त्र प्रतिकाराचीच नीती वापरली आणि प्रत्येक लढाई ते जिंकत गेले. ते एक जूनाच पण उपेक्षित सिद्धांत नव्या स्वरुपात सिद्ध करत होते. हा सिद्धांत होता, हृदयपरिवर्तनाचा सिद्धांत!
गांधींनी पुकारलेल्या संघर्षातील यश माझ्या लक्षात आल्यावर मला स्वस्थ बसवेना. मी त्यांची मिळतील तेवढी पुस्तके वाचायला सुरवात केली. त्यासाठी ग्रॅन्ट रोड स्टेशनजवळ असलेले सर्वोदय बुक स्टाॅल मी शोधून काढले. तिथे मला त्यांची एरवी सहज न मिळू शकणारी अनेक पुस्तके मिळाली.
माझ्या लक्षात आले की १९०८ ला त्यांनी लिहीलेल्या ‘ ‘हिंद स्वराज्य’ या पुस्तकातून त्यांचे सर्व जीवन तत्त्वज्ञान प्रकट झाले आहे. हे लक्षात घ्यायला हवे की हे पुस्तक लिहीताना ते दक्षिण आफ्रिकेतच होते, अजून भारतात आले नव्हते. आणि या पुस्तकाच्या लिखाणाची पार्श्वभूमी देखील रोचक आहे. दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांच्या प्रश्नाबाबत इंग्लंडमध्ये ते बाजू मांडायला गेले असताना त्यांची तिथे भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या जहाल मंडळींशी भेट झाली. भेटीत अनेक मतभेदाचे मुद्दे उपस्थित झाले. त्या मतभेदांना मुद्देसूद उत्तरे म्हणजे हे पुस्तक. या पुस्तकाची शैली संवादाची आहे. त्यात एक संपादक व एक वाचक चर्चा करतात असे मांडले आहे.
त्यानी ते पुस्तक इंग्लंडहून दक्षिण आफ्रिकेत परत जात असताना बोटीच्या प्रवासात लिहून काढले होते. त्यानंतर सात-आठ वर्षांनी त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. ‘हिंद स्वराज’ मध्ये लिहिलेल्या जीवन मूल्यांवर ते शेवटपर्यंत अढळ राहीले. त्यांचे तत्त्वज्ञान जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी होते. त्यांच्यासाठी सामाजिक जीवन व वैयक्तिक जीवन या दोन भिन्न गोष्टी नव्हत्या. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. कारण मला सामाजिक कामात असणाऱ्या अशा अनेक व्यक्ती ठाऊक आहेत ज्या त्यांच्या कौटुंबिक जीवनात ते प्रचारत असलेली मुल्ये जगत नाहीत. गांधींचे हेच वेगळेपण होते. त्यामुळेच त्यांचा सत्याग्रह जसा ब्रिटिश सरकारविरोधात चाले तसाच तो त्यांच्या प्रेमळ कस्तुरबांविरूद्ध देखील चाले. आणि का नाही चालणार? तो तर प्रेमाचा सिद्धांत होता. विरूद्ध बाजूच्या कल्याणाचाही त्यात विचार होता. हृदयपरिवर्तन हे त्याचे मूळ होते.
गांधीजींच्या लढाईचे वैशिष्ट्य असे की तिचे ध्येय दुष्ट शत्रूचा नाश नसून शत्रूच्या दुष्टत्वाचा- दुर्गुणांचा नाश हे होते. त्यांना अधःपतीत झालेल्या – बिघडलेल्या विरोधकाची उन्नती साधायची होती. माणूस हा मूळात वाईट नसतो, परिस्थिती त्याला वाईट बनवते. त्याला त्याचा उणेपणा आपण दाखवून दिला आणि त्याचा विवेक जर आपण जागवू शकलो तर तो पुन्हा चांगला बनू शकतो, हा मानसोपचाराचा मूलभूत सिद्धांत गांधी वापरत होते.
शत्रूशी शारीरिक बळाने तोंड देण्याची भिती त्यांना वाटत नव्हती. दक्षिण आफ्रिकेत असताना ब्रिटिशांची प्रजा म्हणून कर्तव्य भावनेने झुलू, बोअर युद्धांत आरोग्य कर्मचारी म्हणून आपल्या हिंदी तुकडीसह रणांगणात त्यांनी काम केले होते. शत्रूला शक्तीने वाकवण्याची ताकद असून सुद्धा त्याला प्रेमाने समजावण्याचा त्यांचा मार्ग होता. त्यांची अहिंसा परिस्थितीवशात नव्हती. त्यांचा विरोध पॅसिव्ह रेझिस्टन्स नव्हता. तो सत्याग्रह होता. त्यांच्या सत्याग्रहासाठी अमर्याद मानसिक शौर्याची गरज होती. समोरची व्यक्त शारीरिक बळ वापरत असताना, आपण शारीरिक बळ न वापरता आणि परिस्थिती सोडून पळून न जाता मरेपर्यंत सत्यावर दृढ रहाणं म्हणजे त्यांचा सत्याग्रह होता.
गांधीजींचे देशप्रेम हे भारत नावाच्या भौगोलिक क्षेत्रावर नव्हते, तर त्या जमिनीवर रहाणार्या लोकांवर होते. त्यामुळे त्यांना केवळ अभिमानाखातर गोर्या साहेबाला घालवून काळ्या साहेबाचे राज्य आणायचे नव्हते. त्यांना कनिष्ठातील कनिष्ठ देशबांधवांची उन्नती साधायची होती. त्यामुळे राजकीय स्वातंत्र्यासाठी चळवळ करतानाच ते विधायक कार्यक्रम राबवत होते. आपल्या गरीब बांधवांना काम देणे हा त्यांचा ‘स्वदेशी’ मागचा विचार होता. स्वदेशीचा वापर आणि परदेशी मालावर बहिष्कार या त्यांच्या नीतीने व्यापारी इंग्रजांच्या भारतावर राज्य करण्याच्या मूळ उद्देशालाच हादरा दिला.
गांधीजी महात्मा म्हणून किंवा दैवी गुण घेऊन जन्मले नव्हते. सामान्य भारतीय म्हणूनच ते जन्मले. सामान्यतः सुजाण व समृद्ध घरात जे संस्कार मुलांवर होतात, तसेच संस्कार त्यांच्यावर झाले. दक्षिण आफ्रिकेत जाईपर्यंत ते एक सामान्य सज्जन तरुण होते. दक्षिण आफ्रिकेत जाताना पैसे कमावून श्रीमंत सुखवस्तू होणे, हेच त्यांचे ध्येय होते. पण आफ्रिकेतील जीवनात प्रसंगवशात होणाऱ्या सर्व चांगल्या विचारांचा संस्कार त्यांनी स्वतःवर होऊ दिला. रस्कीनच्या ‘सर्वोदय’ आणि टाॅलस्टाॅयच्या ‘वैकुंठ तुझ्या हृदयात’ या दोन पुस्तकांनी त्यांची जीवनशैली बदलून टाकली. त्यांचे ध्येय केवळ राजकीय हक्कांपर्यंत मर्यादित न राहता ते गरीबातल्या गरीब माणसाच्या उन्नतीपर्यत पोचले. वकीलापासून भंग्यापर्यंतचे सर्व व्यवसाय सारख्याच मोलाचे असून प्रत्येक माणसाने स्वतःच्या भाकरीसाठी शारीरिक श्रम केलेच पाहिजेत. नाहीतर ती श्रमचोरी ठरेल, असा विचार त्यांच्या मनात दृढ झाला. याच्याही पुढे जाऊन गरजेपेक्षा जास्त साठवणे ही सुद्धा चोरी आहे असा विचार ते करू लागले. निसर्ग दररोज आवश्यक असेल तेवढेच निर्माण करतो. त्यामुळे साठवण्याची प्रवृत्ती कुणाच्यातरी जीवनात कमतरता नक्कीच निर्माण करणार असे ते मानत. शिवाय ‘उद्यासाठी साठवणे’ म्हणजे जगतपालक परमेश्वरावर अविश्वास असे त्यांचे एखाद्या संतासारखे म्हणणे होते. आणि हे म्हणणे जीवनात आणण्यासाठी त्यांनी आपली चांगली चालत असलेली वकीली सोडून देऊन स्वेच्छेची गरीबी स्विकारली. पण अशी स्वेच्छेची गरीबी स्विकारणे दुसर्या कोणालाही पटले तरी त्याला स्वतःकडील सर्व संपत्तीचा क्षणात त्याग करणे, सहजासहजी शक्य होणार नाही याचे त्यांना भान होते. म्हणूनच त्यांनी अशा मंडळींसाठी विश्वस्ताची कल्पना मांडली. स्वतःच्या संपत्तीचे विश्वस्त होणे म्हणजे आपल्याकडील संपत्ती ही आपल्या मालकीची नसून ती आपल्याकडे असलेली परमेश्वराची ठेव समजावी व तिचा विनियोग स्वतःसाठी न करता समाजसेवेसाठी करावा व आपल्या उपजीवीकेचे साधन शारीरिक श्रम हेच ठेवावे. ही सर्व वैचारिक वाटचाल करताना ते अनेकदा चुकले. पण चूक समजल्यावर प्रत्येकवेळी ती कबूल करून ते सुधारत गेले. स्वतःच्या विचारांवर पूर्ण विश्वास असूनही त्यांचे अंधानुकरण न करता तुम्हाला तुमच्या विवेकाच्या कसोटीवर तपासल्यावर जेवढे योग्य वाटेल तेवढेच स्विकारण्याची सूचना त्यांनी केली.
गांधींच्या विचारांची भिस्त आत्मिक उन्नत्तीवर होती. धर्माच्या सनातन तत्त्वांवर त्यांची श्रद्धा होती. मोक्ष अथवा जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमची मुक्ती, हे त्यांचे जीवनध्येय होते. हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांची सारी धडपड होती. सत्य हा परमेश्वर असून त्याच्याकडे जाण्याचा मार्ग म्हणजे अहिंसा असे ते मानत. पण शरीर असेपर्यंत पूर्ण अहिंसा पाळणं आणि सत्याचं पूर्ण दर्शन होणं शक्य नाही, याची त्यांना जाणीव होती. सर्व प्राणिमात्रात अखंड वास करणाऱ्या परमेश्वराची पूजा आपल्या प्रत्येक कृतीतून व्हावी, यासाठी ते प्रयत्नशील होते. त्याहीपुढे ईश्वरी इच्छेशिवाय आपल्या सर्व प्रयत्नांची किंमत समाज परिवर्तनाच्या दृष्टीने शून्य आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. अंतरात्म्याच्या आवाजापुढे त्यांना लौकीक परीणामांची भिती उरली नाही. निराकार ईश्वराची कल्पना त्यांना जास्त पटत होती, तरी सुद्धा नामस्मरण आणि प्रार्थना यावरील त्यांचा विश्वास अनुभवाने दृढ झाला होता. शेवटी प्रार्थनेला जाताना रामनाम घेत ते हे जग सोडून गेले.
मी इथे मला समजलेली गांधींची जीवनदृष्टी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तिची व्यवहार्यता मला स्थलकालातीत वाटते. गांधींच्या काळात त्यांच्या विनोबा, अप्पासाहेब पटवर्धन वगैरे अनेक अनुयायांनी ही जीवनदृष्टी स्विकारली. त्यांच्यानंतर मार्टिन ल्युथर किंग सारख्यांनी त्यांच्या मार्गाने वाटचाल केली. सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एरीक एरीकसनला त्यांच्या व्यक्तीत्वाचं इतकं आकर्षण वाटलं की त्याने त्याचं चरीत्र लिहीलं, ज्याचा संदर्भ आमच्या मानसशास्त्रावरील पाठ्यपुस्तकात होता.
पण गांधींच्या जीवनदृष्टीचं मला जाणवणारं वेगळेपण म्हणजे ती कोणा अवताराने नव्हे तर एका सर्वसामान्य माणसाने स्वतःच्या जीवनात सिद्ध केलेली जीवनदृष्टी होती, तिच्या प्रभावामुळे गांधी आम्हाला महात्मा वाटले, एवढेच!
Her oyuncuya özel fırsatlar sunan bettilt kullanıcılarını ödüllendiriyor.
Bahis dünyasında kullanıcıların %49’u sosyal medya üzerinden kampanyalardan haberdar olmaktadır; bettilt dijital kampanyalarını bu trendle uyumlu yönetir.
Yeni sezonda sunduğu yüksek oranlarla dikkat çeken bettilt giriş bahis tutkunlarının ilgisini çekiyor.
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
