Homeब्लॉगचार चौघे...!

चार चौघे…!

डॉ. रुपेश पाटकर : एखादा दिवस अचानक असा येतो की भलतेच काही दर्शन देऊन जातो. दर्शन म्हणजे दिसणे हा साधा अर्थ. पण काहीवेळा हे दिसणे तत्त्वज्ञानाच्या पठडीतले असते. मागचा रविवार माझ्यासाठी असाच गेला.
रमेशला घेऊन त्याची बायको तिसर्‍या फाॅलोअपला आली होती. अर्थात या तीनही भेटी आमच्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे झाल्या नव्हत्या. त्याचे कारण म्हणजे रमेशची फाॅलोअपला येण्याबाबतची टंगळमंगळ. त्यात तो एकदा रिलॅप्सदेखील झाला होता. त्याच्या अनियमितपणामुळे त्याची ट्रीटमेंट पुढेच सरकत नव्हती. पुन्हा पुन्हा दळण दळल्याप्रमाणे आम्ही एकाच मुद्द्यावर बोलत होतो. तो म्हणजे दारू पिण्याची अनिवार इच्छा हाच मुळी आजार आहे. आजार म्हटले की त्याची पथ्ये असतात. या आजाराची पथ्ये म्हणजे दारूशी संबंधित जागा आणि मित्र मंडळी टाळणे. क्रेव्हिंग शक्यतो होऊ नये म्हणून पोट भरलेले ठेवणे. थकवा येऊ नये म्हणून अतिकाम करणे टाळणे, एकटेपणा टाळणे वगैरे वगैरे वगैरे. मी डिटाॅक्सीफीकेशनसाठी पाच दिवसांच्या औषधांच्या कोर्सचे प्रिस्क्रीप्शन लिहून दिले. ते घेत रमेश म्हणाला, “डॉक्टर, आता बघा मी तुम्हाला सोबर राहून दाखवतो.”
मी हसलो. तितक्यात त्याची बायको म्हणाली, “मागच्यावेळी आम्ही इथून जाताना हा मला असेच म्हणाला होता की मी एक वर्ष सोबर राहीन आणि नंतरच डॉक्टरना येऊन भेटेन. तुम्हाला भेटायला येण्याचे हा टाळतो, ते हेच निमित्त सांगून.”
काहीतरी गल्लत होत आहे हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे जाण्यासाठी उठलेल्या त्या दोघांना मी पुन्हा बसवले.
“मित्रा, तू माझ्याकडे डॉक्टर म्हणून आला आहेस. डॉक्टरला आपण केव्हा आणि का भेटतो? आपल्याला बरे नसेल तेव्हा उपचार घेण्यासाठी. बरे झाल्यानंतर कोणी कशाला डॉक्टरला भेटावे. पण तू नेमका उलटा विचार करत आहेस.
तू सोबर राहू शकत नाहीस म्हणून आपण भेटतोय. तुला सोबर रहायला मदत व्हावी म्हणून.
पण तू वेगळाच अर्थ लावलास. मी तुला जणू आव्हान देतोय असा तू अर्थ करून घेतलास.
तू माझ्याकडे येण्याआधीपासून तुला आजार आहे. त्यावर उपचार करण्यासाठी तू माझ्याकडे आलास.
तुला आजार आहे, यात कमीपणा नाही आणि मी तुझ्यावर उपचार करतोय यात माझा मोठेपणा नाही.
मद्यपाशाचा आजार माझ्यामध्ये देखील असू शकला असता.
वास्तव असे आहे की अनेक लोक दारू पीत असले तरी ते अति दारू पिणाऱ्याला हसतात. त्याला तुच्छ लेखतात. असे तुच्छ लेखणे चुकीचे असले तरी ‘मद्यपाश हा आजार आहे’ हे माहीत नसल्यामुळे ते अशी प्रतिक्रिया देतात. पण त्यामुळे होते काय की मद्यपाशग्रस्त पेशंटला लाजिरवाणे वाटू लागते. या लाजिरवाणेपणावर मात करण्याचा एक मार्ग मन शोधून काढते आणि तो म्हणजे आपल्याला काही पिण्याची समस्या आहे हेच नाकारणे.
तू देखील या प्रमाणेच विचार करतो आहेस. मी तुझा प्रतिस्पर्धी नाही, तू सोबर राहूच शकणार नाहीस असे आव्हान देणारा मी नाही. त्यामुळे तुला या आजारावर मात करायला जी काही मदत माझ्याकडून होण्यासारखी आहे, ती द्यायला मी उत्सुक आहे. ते ही बरोबरीच्या नात्याने.”
रमेश मनापासून हसला. आणि आपण भेटत राहू असे म्हणून तो निघून गेला.
रमेश गेल्यानंतर मिहीर आला. तो देखील मला तीन महिन्यांच्या गॅप नंतर भेटत होता. त्याची आई त्याला घेऊन आली होती. खरे तर मिहीरचे घर माझ्या क्लिनिकपासून पाच किलोमीटर अंतरावर. शिवाय मी त्याच्याकडून फी घेत नसल्यामुळे त्याने फाॅलोअप टाळण्याची गरज नव्हती.
“मिहीर, कुठे तू? बरेच दिवसात नाही आलास,” मी विचारले.
“डॉक्टर, सध्या ऊन खूप लागते ना, म्हणून नाही आलो,” तो म्हणाला.
“मग रिक्षाने यायचे,” मी म्हणालो.
“डॉक्टर, मी गरीब माणूस. रिक्षा कुठे परवडणार मला,” तो म्हणाला.
त्यावर मी काही बोलणार त्याआधी त्याची आई म्हणाली, “रिक्षा परवडत नाही, पण दारू मात्र परवडते. गेल्या तीन महिन्यांत हा इतकी दारू प्यायला आहे ना, की त्या पैशात आठवड्यातून दोनदा तुम्हाला रिक्षा करून भेटायला येणे परवडले असते.”
मिहीर देखील वास्तव नाकारत होता. त्यासाठी तो फुटकळ कारण देत होता. आईने असे बोललेले त्याला आवडले नाही. मला त्याला आईच्या बोलण्याचा हेतू समजावून सांगावा लागला.
“तू माझ्याकडे उपचारासाठी येतोस. तुला आजार आहे आणि या आजारात माणसाचे मन प्रामुख्याने डिनायल (वास्तव नाकारणे) आणि प्रोजेक्शन (दुसर्‍यावर आरोप लावणे) ही मेकॅनिजम वापरत असते. तू फाॅलोअपला न येण्यासाठी उन्हाला जबाबदार धरलेस आणि नंतर आर्थिक परिस्थितीला. या दोन्ही गोष्टी खरी करणे नव्हेत. आपण अजूनही आपल्या अति पिण्याला, आजार म्हणून समजून घेतलेले नाही, म्हणून आपण अशी कारणे देतो आहोत.
आता देखील आपण जी चर्चा करतो आहोत, ती पोलीस आरोपीला शब्दात पकडू पाहतात तशातली नाही.
उपचारासाठी जायला टंगळमंगळ होणे हे आजाराचेच लक्षण आहे. ‘ड्राय ड्रंक’ अवस्थेत फाॅलअप टाळण्याची प्रवृत्ती दिसते. ड्राय ड्रंक म्हणजे पेशन्ट दारू पीत नसतो, पण त्याची विचार करण्याची पद्धत मात्र पीत असताना असते, तशीच असते. त्यामुळे पेशन्ट पितो की नाही एवढेच पाहणे पुरेसे नाही, तो विचार कसा करतो, भावना कशा हाताळतो, वागणूक कशी ठेवतो हे तितकेच महत्त्वाचे आहे,” मी म्हणालो.
त्यानंतर अजयने मला दर्शन दिले. जवळपास पाच महिन्यांनी तो आला होता.
“तू नियमित आला असतास तर बरे झाले असते,” मी म्हणालो.
त्यावर अजय काही न बोलता त्याची बायको म्हणाली, “तुमच्याकडे येण्याची त्यांना लाज वाटते. ते म्हणतात, तुमच्याकडे रविवारचे गेले तर गर्दी असते. त्याना ओळखणारे तिथे भेटतात. म्हणून त्यांनी तुम्हाला मागे फोन केला होता की इतर दिवशी येऊ का म्हणून. पण तुम्ही रविवारीच या म्हणालात म्हणून आम्ही आलो नाही.”
मी हसलो आणि म्हणालो, “ठीक आहे. पण हे पाच महिने कसे गेले?”
“कसे गेले काय विचारता. तुम्ही दिलेल्या गोळ्या संपल्यानंतर बरोबर तेरा दिवस शांत राहिले आणि चौदाव्या दिवसानंतर सुरू केले. मध्ये आपणहून दोनदा थांबले, तेदेखील फक्त आठ आठ दिवसच. गेल्या चार दिवसांपासून आता थांबवली आहे, पण थरथर काही कमी होत नाही म्हणून यायला तयार झालेत,” अजयची बायको म्हणाली.
“अजय मला सांग, तू प्यायला जायचास ते कोणाला नकळत जायचास का? तुला दारू विकत घेताना कोणी पहायचे नाही का?”
त्याने मान खाली घातली.
“दारू खरेदी करण्यात लाज वाटावी की दारू सोडण्यासाठी उपचार घेण्यात? हा आजार आपली विचार करण्याची पद्धतच बदलून टाकतो बघ.”
अजयनंतर चौथे दर्शन झाले ते कुमारचे. कुमार गेले तीन महिने सोबर आहे. तो नियमित माझ्याकडे फाॅलोअपला येतो. मी दिलेली औषधे नित्यनेमाने घेतो.
पण मी पाहिल्या दिवसापासून सांगून सुद्धा तो ‘अल्कोहोलिक्स ॲनोनिमसच्या’ मिटींगना गेलेला नाही. मी त्याला याचे कारण विचारले, तर म्हणाला, “तुम्ही सांगण्याच्या आधीपासून मला ए.ए. च्या मीटिंग माहीत आहेत. आमिर खानच्या प्रोग्रॅममध्ये ए.ए. विषयी माहीती दाखवल्या दिवशीच माझ्या बायकोने ए.ए. ची माहिती काढली. मी त्यानंतर महिनाभर मिटींगा अटेंड पण केल्यात. काही उपयोग नाही त्याचा. तिथे सगळे आपण कसे बायकोला मारले, बापाशी भांडलो, पोरांच्या फीचे पैसे कसे पिण्यावर उडवले हेच सांगत बसतात. दरवेळी तेच तेच. तिथे जणू स्पर्धाच असते, सर्वात जास्त वाईट कोण वागला होता, त्याची.”
“तू त्यांचे ‘बिग बूक’ वाचलेस का? त्यांच्या बारा पायर्‍या अभ्यासल्यास का? त्यांच्या प्रार्थनेवर चिंतन केलेस का?” मी विचारले.
“नाही. हे मला काही माहीतच नाही. अहो, मी जातो त्या ग्रुपमध्ये बहुतेक अडाणी मंडळीच आहेत,” त्याने मीटिंग न करण्याचे दुसरे कारण पुढे केले.
“माणसाचे शहाणपण शिक्षणावर अवलंबून नसते मित्रा. तुझ्या गटातल्या मंडळींना दुसर्‍यांना प्रभावित करणारे भाषण येत नसेल पण त्या तुझ्या म्हणण्याप्रमाणे अडाणी असलेल्या मंडळींपैकी अनेकांनी पाच पाच वर्षे स्वतःला दारूपासून दूर ठेवण्यात यश मिळवले आहे. सुशिक्षित माणसाचे वैशिष्टय़ हेच की त्याच्यात कोणाही माणसाकडून शिकून घेण्याची क्षमता विकसित झालेली असली पाहिजे. त्यांना तिथे त्यांची सोब्रायटी मेंटेन करायला मदत करणारे काहीतरी नक्कीच सापडले आहे. त्यांना काय सापडलेय, तेच तुला शोधून काढून मिळवायचे आहे.
ती अडाणी मंडळी अशा एका संघटनेचे सभासद आहेत जी संघटना तब्बल 88 वर्षापूर्वी अमेरिकेत जन्माला आली. कोणतेही लिखित नियम नाहीत, सभासदांची नोंदणी नाही, सभासद वर्गणी नाही, अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे पदे नाहीत. एकमेव ध्येय स्वतःची सोब्रायटी मेंटेन करणे आणि आपले अनुभव दुसर्‍याला सांगून त्याला सोबर रहायला मदत करणे आणि ही दुसर्‍याला मदत हे दुसर्‍यावर उपकार म्हणून नव्हे तर स्वतःची सोब्रायटी मजबूत करण्याचा मार्ग म्हणून बघणे.
तुला नाही वाटत का हे सगळे चमत्कारिक आहे?
त्याही पुढे ही संघटना निव्वळ योगायोगाने सुरू झाली. दोन दारूडे त्यातील एक सर्जन होता आणि दुसरा शेअर दलाल. ते गप्पा मारत बसले आणि दारू प्यायचे विसरले.”
“डॉक्टर, एवढं सगळं माहित नव्हतं मला. खूपच इंटरेस्टिंग आहे हे. मी या आठवडय़ापासून नक्की जाईन!” तो म्हणाला.
…….

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments