डॉ. रूपेश पाटकर : शर्मिला ही एकोणतीस वर्षांची वकील तरुणी. सतत चिंता वाटत राहते अशी तक्रार घेऊन ती आमच्या ओपीडीत आली होती. तिच्याशी थोडे बोलल्यानंतर ती म्हणाली, “डॉक्टर, मला एक मुलगा आवडतो. मी त्याला गेल्या पाच वर्षापासून ओळखते. मला वाटते, तो मला अनुरूप जोडीदार आहे. मी कोणता निर्णय घेऊ?”
मी हसलो आणि म्हणालो, “तुझा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. तुझ्यासाठी दुसरा कोणी निर्णय घेणार नाही. तुला निर्णय घ्यायला स्पष्टता यावी, यासाठी मदत करण्याचे काम सायकीयॅट्रीस्टचे आहे. प्रत्यक्ष निर्णय तुलाच घ्यायचा आहे.”
“डॉक्टर, तोच तर प्रॉब्लेम आहे. विनू मला अनुरूप आहे, हे मला माहीत आहे. पण मला निर्णय घेता येत नाहीए,” ती म्हणाली.
“का?”
“समजा, माझा निर्णय चुकला तर.. हा विचार येतो आणि मी विनूशी लग्न करायचे पुढे ढकलते. आता तो सुद्धा वैतागायला लागलाय. तो तरी किती दिवस वाट पहाणार. पण मला समजत नाही काय करायचे ते,” ती म्हणाली.
शर्मिला आणि विनूच्या लग्नाला तिच्या आईबाबांकडून विरोध होता. कारण विनू आणि शर्मिलाची जात वेगवेगळी होती. त्यांनी शर्मिलाला सांगितले होते की तिची इच्छाच असेल तर ते तिचे लग्न विनूशी करून देतील. पण त्यांना त्यात खुशी नाही. लग्नानंतर जर काही अडचण आली तर त्याची जबाबदारी शर्मिलाची स्वतःची असेल.
आतापर्यंत कोणताही निर्णय घेताना शर्मिलाला विरोध झाला नव्हता. नव्हे, आतापर्यंत तिने स्वतः कोणताच निर्णय घेतला नव्हता. तिची शाळा, तिचे कॉलेज, तिने कोणती शाखा निवडावी, कोणते विषय घ्यावे हे तिच्यावतीने आईवडिलांनीच ठरवले होते. तिचा निर्णय चुकीचा ठरून तिला प्रॉब्लेम येऊ नयेत या नादात त्यांनी तिला कधी निर्णयच घेऊ दिला नव्हता. पण ‘आपला आपण निर्णय घेतला तर तो चुकेल’ असा संदेश मात्र तिच्या मनातील बालकात (Child) रेकॉर्ड झाला होता. आता पहिल्यांदाच तिच्या आई वडिलांनी अनिच्छेने किंबहुना ‘तू चूकशील’ असा अप्रत्यक्ष संदेश देत निर्णय घ्यायची जबाबदारी तिच्यावर टाकली होती. तिच्याकडे निर्णय घेण्याचा अनुभव नव्हता आणि मनातील बालक (Child) निर्णय घ्यायचा विचार केला की घाबरून जाई आणि तिच्यातील पालकाचे (Parent) रेकॉर्ड ‘तू चूकशील’ ही कॅसेट वाजवत बसे.
निर्णय घेण्यात असमर्थता सांगणारी दोन प्रकारची मंडळी मला भेटत असतात. एक शर्मिलासारखी निर्णय घेणे सतत पुढे ढकलत रहाणारी आणि दुसरी आपण चुकीचे निर्णय घेऊन कसे आतापर्यंत फसत आलो याचा पाढा वाचणारी.
निर्णय घेता न येणे हा त्यांचा प्रॉब्लेम असतो आणि तो त्यांना ठाऊक असतो. पण फक्त प्रॉब्लेम माहीत असून तो थोडाच सुटणार. निर्णय घेण्याचा प्रॉब्लेम सुटण्यासाठी आपल्या मनातील पालकात (Parent) आणि बालकात (Child) काय रेकॉर्डिंग आहेत ती तपासली पाहिजेत. ती तपासण्यासाठी आपल्यातील चालकाला (Adult) कार्यरत केले पाहिजे. हे कसे करायचे त्याचे उत्तम मार्गदर्शन डॉ. थॉमस हॅरिस यांनी श्रीमान ऑरनीश यांचे उदाहरण देऊन केले आहे.
श्रीमान ऑरनीश हे सुमारे चाळीशीचे कुटुंबवत्सल गृहस्थ आहेत. आपण त्यांना एक जबाबदार नागरिक असेही म्हणू शकतो. त्यांना आज सकाळीच एका ओळखीच्या सद्गृहस्थांचा फोन आला. त्यांनी ऑरनीशना सांगितले की संसदेत येऊ घातलेल्या वर्णद्वेषविरोधी विधेयकाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी नागरिकांच्या सह्यांची मोहीम चालू आहे. त्या निवेदनावर सही करण्यासाठी ऑरनीश यांनी यावे. ते विधेयक सर्व वर्णांच्या लोकांना विनाअडथळा कुठेही रहाण्याचा अधिकार मान्य करण्याबाबत होते. पण फोन ठेवल्यापासून ऑरनीशना बेचैन वाटू लागले आणि आजचा चांगला दिवस खराब होईल, अशी काहीशी भावना त्यांच्या मनात उद्भवली.
डॉ. हॅरिस यांनी दिलेले हे उदाहरण मला रोचक वाटले. एखाद्या निवेदनावर सही करण्याचे एवढे काय टेंशन घ्यावे माणसाने. हवी तर सही करावी, नाहीतर नाही म्हणून आपल्या कामास लागावे.
डॉ. हॅरिस यांनी पुढे काय लिहिले आहे, ते मी उत्सुकतेने वाचू लागलो.
काय दडले आहे, ऑरनीश साहेबांच्या पालकात (Parent)? याचा मागोवा डॉ. हॅरिस घेऊ लागले तेव्हा त्यांना जाणवले की त्यांच्या पालकात ‘तुमचे कुटुंब आणि तुमची मुले यांचे हीत तुम्ही आधी पाहायला हवे’; ‘कोणी सांगितलेय तुम्हाला नको त्या गोष्टीत नाक खुपसायला?’; ‘तुमच्या कर्माने घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळता कामा नये’; ‘तुम्हीच का? बाकीचे नाहियेत? ते बघून घेतील’; ‘लष्कराच्या भाकर्या भाजायला कोणी सांगितल्यात?’ हे हुकूम वजा विचार भरलेले आहेत.
पण ऑरनीश साहेबांच्या पालकात एवढेच नव्हते. ‘निग्रो’ या तुच्छता दर्शक शब्दाखाली बरेच काही झाकलेले होते. ‘त्यांना त्यांच्या पायरीवरच ठेवायला हवे’; ‘ते निग्रो आहेत बस, यापुढे एक शब्द बोलायचा नाही.’ (ऑरनीश यांच्या कानात निरुपद्रवीसे वाटणारे एक बडबडगीत कोणे एके काळी गुणगुणले गेले होते, ‘इनी मिनी मीनी मो, कॅच ए नीगर बाय द टो!’) अगदी लहान वयात त्यांच्या मनातील पालकात (Parent) झालेले रेकॉर्डिंग पुढच्या आयुष्यात सतत पालकांकडून मिळणार्या आज्ञासदृश्य सूचनांमुळे मजबूत होत गेले होते.
ऑरनीश यांच्या मनातील बालकाचे (Child) रेकॉर्डिंग निग्रो शब्दाशी भीतीची भावना वाजवत होते. ‘मी निग्रोना पाठींबा दिला तर मला माझ्या गोर्या समाजात काय म्हणतील?’ ‘उद्या समजा, माझ्या मुलीने एखाद्या निग्रोलाच नवरा म्हणून पसंत केले तर…’ वगैरे.
ऑरनीश साहेबांच्या बालक आणि पालक यांच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर त्यांच्या मनातील चालक (Adult) कसा विचार करत असेल याची उत्सुकता मला वाटली. त्यांच्या चालकाविषयी बोलताना डॉ. हॅरिस म्हणाले, “श्रीमान ऑरनीश हे जर फारसा ‘विचार न करणारे’ सामान्य माणूस असते, तर त्यांच्या मनात गोंधळ उडालाच नसता. ते आपल्या मनातील पालकाकडे (Parent कडे) कारभार सोपवून मोकळे झाले असते. आणि निवेदनावर सही करायची नाही, असा निर्णय घेऊन मोकळे झाले असते.
पण त्यांच्यातील चालक (Adult) वर्णद्वेषाचे गांभीर्य समजून निर्णय घेऊ इच्छित होता. त्यांच्या चालकाला गुलामगिरीचे पाप समजत होते. त्याला कृष्णवर्णीयांना गुरांप्रमाणे वागणूक देण्यातले क्रौर्य समजत होते.
इथे ऑरनीशना त्यांच्या पालक (Parent), चालक (Adult) आणि बालक (Child) या तिघांतील माहितीचे विलगीकरण करण्यास शिकवण्याची गरज होती. इथे लक्षात ठेवले पाहीजे की ऑरनीशना सामोरे जावे लागले तशा प्रसंगात अनेकदा पालक (Parent) चालकाला (Adult ला) दूषित करतो.
दुसरी पायरीवर चालकाला घेऊन वरील तिन्ही गटातील माहिती तपासण्याची गरज होती. डॉ. हॅरिस यांनी ऑरनीशना सांगितले की त्यांनी त्यांच्या मनातील पालकाला (Parent ला) विचारायला हवे की त्याचे पालक वर्णद्वेषासारख्या गोष्टींवर विश्वास का ठेवत होते? त्यांनी त्यांच्या मुलांना निग्रोंबाबत भिती का घातली? ते त्यांच्या स्वतःच्या पालक- चालक- बालक यांचा पडताळा घेऊ शकण्यास सक्षम होते की नव्हते? त्यांची ज्या मतांवर श्रद्धा होती, ती मते सत्याला धरून होती की नव्हती? याचा त्यांनी कधी विचार केला होता का? गोरे लोक काळ्या लोकांपेक्षा श्रेष्ठ असतात काय? वर्णद्वेषाविरोधात भूमिका घेणे म्हणजे गोर्या लोकांच्या न्याय हक्काना विरोध करणे आहे काय? ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजातील प्रश्नांबाबत आपण का भूमिका घ्यायची नाही?
दुसरा मुद्दा ऑरनीश यांच्या मनातील बालकाला (Child ला) तपासण्याचा होता. बालकाला वाटणारी भिती रास्त आहे का? लहान वयात वाटणारी भिती वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी का वाटावी? उलट त्रेचाळीसाव्या वर्षी घेतलेल्या स्टेप्स वास्तव बदलण्यास हातभार लावून समाजातील विकृती संपवू शकतात, याची जाणीव ऑरनीश यांना करून द्यावी लागली.
ऑरनीशप्रमाणे शर्मिलाला देखील तिच्या पालक- चालक- बालक यांचा शोध घ्यायला मदत करावी लागली. त्यांचे विलगीकरण करून त्यांना प्रश्न विचारण्यास शिकवावे लागले. आईवडिलांच्या इच्छा, आज्ञाधारकपणा, संस्कार, लोक काय म्हणतील, जात वगैरेबाबत तिच्या पालकातील अट्टाहासांना प्रश्न करायला मदत करावी लागली. ‘कर्तव्य म्हणून आम्ही तुझे लग्न करून देऊ, पण त्यात आमचा आनंद असणार नाही. पुढील परिणामांची जबाबदारी तुझी’ असे सांगून शर्मिलाच्या मनातील बालकाला भिती घालून निर्णय घेणे डळमळीत करण्याचा खेळ तिचे पालक खेळत आहेत का, हेदेखील तिला तपासायला सांगावे लागले.
तिने लगेच निर्णय घेतला नाही. पण आपण निर्णय घेण्यास टाळाटाळ करण्यामागचे कारण तिला स्पष्ट झाल्याने तिचा ताण बराच कमी झाला. आमच्या शेवटच्या भेटीनंतर सहा महिन्यानी शर्मिला आमच्या क्लिनिकमध्ये पुन्हा आली. “डॉक्टर, मी शेवटी लग्नाचा निर्णय आत्मविश्वासाने घेतलाय,” असे हसतमुखाने सांगत तिने तिच्या लग्नाची पत्रिका माझ्या हातात दिली.
……
डॉ. रुपेश पाटकर


