Homeब्लॉगबिलयर्डचे चेंडू....?

बिलयर्डचे चेंडू….?

डॉ. रूपेश पाटकर

तुम्हाला बिलयर्डचा खेळ माहीत आहे का? मी तो प्रत्यक्षात कधीच पाहिला नाहिये. सिनेमात फक्त पाहिलाय. त्यात कॅरमबोर्डसारख्या बोर्डावर अनेक गुळगुळीत चेंडू ठेवलेले असतात आणि खेळणारी मंडळी एका बारीक काठीच्या टोकाने एका चेंडूला ढकलतात. तो चेंडू मग दुसर्‍या चेंडूंना ढकलतो. हे वर्णन मला आज का आठवतेय माहीत आहे का? कारण माझा एक क्लाएंट आज मला हे सांगून गेला की “माणूस हा बिलयर्ड खेळातील चेंडूसारखा असतो. कुठे जायचे? कोणत्या गतीने जायचे? हे त्या चेंडूंसारखे त्याच्या हातात नसते. ते त्याच्यावर आपटणार्या दुसर्‍या चेंडूवर अवलंबून असते. नव्हे, ते मूळात काठीने पहीला चेंडू किती जोराने, कोणत्या दिशेत ढकलला यावर अवलंबून असते. चेंडूने फक्त धक्के बसतील तसे गडगडत जावे, बस.”
त्याने आपली तुलना बिलयर्ड चेंडूशी करताच मला डॉ. व्हिक्टर फ्रँकल आठवले. डाॅ.फ्रँकल हे मनोविकारतज्ज्ञ होते, पण त्यांनी आयुष्याची तब्बल चार वर्षे नाझी जर्मनीच्या छळछावण्यात एक युद्धकैदी म्हणून घालवली होती. या काळात त्यांची गरोदर पत्नी, भाऊ भावजय, आईवडील ठार मारले गेले. त्यांना ज्या छळछावण्यात ठेवण्यात आले होते, तेथून जीवंत परत जाण्याची अजिबात शक्यता नव्हती. त्यांना जेव्हा तिथे नेण्यात आले तेव्हा त्यांच्या सोबतच्या काम करू न शकणार्‍या माणसाना गॅसचेंबरमध्ये घालून ठार करण्यात आले. अपुरे अन्न, कडाक्याची थंडी, विश्रांती जवळपास नाहीच अशा स्थितीत एक दिवस आपण देखील कामासाठी निरुपयोगी ठरू आणि गॅसचेंबरमध्ये पाठवले जाऊ हेच भविष्य स्पष्ट दिसत होते. अशा परिस्थितीत त्यांच्या सोबतचे अनेक कैदी हताश होऊन आत्महत्या करीत. पण त्या निराश परिस्थितीत डाॅ.फ्रँकल मात्र तग धरून राहीले. अशा परिस्थितीतून गेलेला हा माणूस म्हणतो की माणसाकडून सारे काही हिरावून घेतले तरी एक गोष्ट त्याच्याकडून हिरावून घेतली जाऊ शकत नाही, आणि ती म्हणजे कोणत्याही प्रसंगाला कोणती भावनिक प्रतिक्रिया द्यावी याचे स्वातंत्र्य! तुमच्या मनात तुम्ही काय विचार करता हे कोणीही ठरवू शकत नाही. छळछावणीतील त्या भयाण दिवसात डॉ.फ्रँकल कोणता विचार करत होते, माहित आहे का? ते विचार करत, एका भाषणाचा! कसले भाषण? ‘छळछावणीतील छळाचा तेथील कैद्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम!’ हे जेव्हा मी वाचले तेव्हा मला या माणसाची कमाल वाटली. ते जो विचार करत होते, तो त्यावेळी अशक्यकोटीतला होता. नाझी फौजा हरल्याशिवाय ते शक्य नव्हते. आणि नाझींचा पराजय होईल असे कोणालाच वाटत नव्हते. अशी परिस्थिती असतानाही ते एक दिवस हरतील. तोपर्यंत आपण जीवंत राहू. आपली सुटका होईल. आणि त्यानंतर आपल्याला छळ छावणीतील अनुभवावर बोलायला बोलवतील, तेव्हा आपण कसे भाषण द्यावे, कोणते मुद्दे मांडावे याचा विचार ते करत होते. वजनदार लोखंडी पाईप उचलून नेताना, पाईपलाईनसाठी खोदाई करताना एका बाजूला त्यांचे शरीर श्रमत होते आणि दुसरीकडे डोक्यात भाषणाचे चित्र हा माणूस रंगवत होता. त्यांनी जगाला सांगितले की माणूस प्रत्येक क्षण अर्थपूर्ण बनवू शकतो, अगदी आपल्याला सर्वात hopeless वाटणारा क्षणदेखील! त्यांनी अर्थपूर्ण जगण्याची शिकवण देणाऱ्या ‘लोगो थेरपी’ नावाच्या उपचार पद्धतीचा सिद्धांत मांडला.
‘ट्रांझक्शनल ॲनॅलिसीस’ या उपचार पद्धतीवर पुस्तके लिहून तिचा प्रसार करणारे डॉ. थॉमस हॅरिस स्पष्टच म्हणतात, “बिलयर्डचा चेंडू आणि माणूस यात मूलभूत फरक आहे. चेंडू निर्जीव आहे. त्याला जसे ढकलले जाते, तसा तो सरकत रहातो. पण माणसाचे तसे नाही. माणूसाला मेंदू आहे. तो विचार करतो. त्याच्या विचाराचे देखील एक वैशिष्टय़ आहे, ते म्हणजे तो केवळ होऊन गेलेल्याच गोष्टीचा विचार करतो असे नाही तर अजून न घडलेल्या भविष्यातील संभावनांचा देखील तो विचार करतो.”
डॉ. हॅरिस यांचा हा मुद्दा बारकाईने समजून घ्यायला हवा. जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट पद्धतीने वागताना दिसते तेव्हा आपण तिच्या वागण्याचे कारण शोधू लागतो आणि आपण म्हणतो की तिच्यावर अमुक संस्कार झाले किंवा तिचे बालपण अमुक वातावरणात गेले म्हणून ती तशी वागते. म्हणजे तिच्या आजच्या भल्याबुर्‍या वागण्याला तिला बालपणात मिळालेले संस्कार जबाबदार आहेत. इथे डॉ. हॅरिस असा प्रश्न उपस्थित करतात की असे जर स्विकारले तर मग माणसाच्या कोणत्याही कृत्याला तो माणूस स्वतः जबाबदार नाही असे म्हणावे लागेल. हे खरे आहे का? माणसाचे आजचे वागणे, त्याच्यावर भूतकाळात झालेल्या संस्कारांवरच केवळ अवलंबून आहे का? या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर माणूस म्हणजे बिलयर्डचा चेंडू ठरेल. डॉ. हॅरिस यावर अधिक विचार करण्यासाठी आणखी एक प्रश्न करतात. एकाच प्रकारचे बालपण मिळालेल्या सगळ्या व्यक्ती एकाच तर्‍हेने वागत नाहीत, त्याचे कारण काय? त्याचे कारण माणसाचे विचार करणे. भविष्यातील संभावनांचा विचार करणे, आपल्या कृत्याच्या परीणामांचा विचार करणे. त्यामुळे माणूस हा असहाय्यपणे धक्के खात गडगडत जाणारा बिलयर्डचा चेंडू नाही.
“मग माणसे बदलत का नाहीत? वर्षानुवर्ष एकाच तर्‍हेने ती का वागत रहातात?” माझ्या दुसर्‍या एका क्लायंटने विचारले होते.
“माणसांना कसे बदलायचे हे माहीत नसते म्हणून ती बदलत नाहीत!” कोणत्याही घटनेला त्यांचा ठरलेला विशिष्ट प्रतिसादच का येतो? दरवेळी नव्या उमेदीने नवी नोकरी धरणारे श्रीमान शूमेकर काही महिन्यातच नोकरीचा तडकाफडकी राजीनामा का देतात? यापुढे बायकोशी वाद घालायचा नाही असे कौटुंबिक सल्ला केंद्रात ठरवून निघालेल्या विक्रांतचे दुसर्‍याच दिवशी त्याच्याही नजरेत क्षुल्लक असणाऱ्या कारणावरून बायकोशी टोकाचे भांडण का होते? याचे स्पष्ट कारण आपल्या मनातील बालकात (Child) आणि पालकात (Parent) रेकॉर्ड झालेल्या गोष्टी तशाच प्रकारच्या प्रसंगात पुन्हा वाजायला लागतात हे आहे. हे जर जाणीवपूर्वक बदलायचे असेल तर आपल्यातला चालक (Adult) मजबूत करायला हवा. त्याने आपल्या बालकात (Child) आणि पालकात (Parent) मध्ये काय दडले आहे हे शोधायला हवे आणि आजच्या वास्तवावर तपासायला हवे. त्यासाठी आपला संवाद तपासायला हवा. आपण जे दुसर्‍याशी बोललो, दुसर्‍याला जो प्रतिसाद दिला, तो आपल्यातील कोणाचा होता, पालकाचा, चालकाचा की बालकाचा? आपल्यातील चालकाने त्या परिस्थितीत कोणता प्रतिसाद दिला असता? याचा सतत अभ्यास करणे म्हणजे आपल्या चालकाला बलवान करणे.
स्वतःच्या पालक- चालक- बालक यांना तपासण्यासोबतच हेदेखील लक्षात घ्यायला हवे की समोरच्या व्यक्तीत देखील बालक (Child) आणि पालक (Parent) यांचे रेकॉर्डिंग आहे. समोरची व्यक्ती आपल्याशी बोलताना तिचा पालक (Parent) बोलतोय की तिचा चालक (Adult) बोलतोय की बालक (Child) बोलतोय हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आणि ते आपल्यातील कोणाशी बोलतात हेदेखील लक्षात घ्यायला हवे. श्रीमती रोझा यांच्याबाबतीत घडलेल्या एका प्रसंगातून आपण हे समजून घेऊ. श्रीमती रोझा सकाळी कपड्याच्या दुकानात गेल्या होत्या. त्यांना त्यांच्या भाचीच्या लग्नात वापरण्यासाठी नवा ड्रेस हवा होता. दुकानातील सेल्समनने त्यांना अनेक ड्रेस दाखवले. त्या ते बघत असताना त्याने आणखी काही ड्रेस काढले आणि त्यातील आकाशी रंगाचा ड्रेस दाखवत तो म्हणाला, “हा नवीन स्टॉक आला आहे. तुम्हाला हा आकाशी ड्रेस भारी दिसला असता, पण थोडा महाग आहे. तुमच्या बजेटमध्ये बसेल का?”
“भाचीचे लग्न पुन्हा पुन्हा थोडेच होणार आहे. हाच ड्रेस द्या!”
श्रीमती रोझा यांनी सेल्समनने सांगितलेला तो महाग ड्रेस खरेदी केला.
खरं म्हणजे त्यांना दुसरा चॉकलेटी रंगाचा ड्रेस आवडला होता. पण त्यांनी आपल्याला आवडलेला ड्रेस खरेदी न करता, सेल्समनने सांगितलेला खरेदी केला. वरवर पाहता रोझाबाई आणि सेल्समन यांच्यातील संवाद दोन चालकांमधला (Adult मधला) वाटतो. पण प्रत्यक्षात तो तसा नाहिये. त्या सेल्समनच्या पालकाने (Parent ने) रोझाबाईंच्या बालकाला (Child ला) उचकावले आहे. आणि त्यांच्यातील बालकाने सेल्समनने सांगितलेला ड्रेस खरेदी केला आहे.
मी जेव्हा अशा तर्‍हेच्या संभाषणांविषयी पहिल्यांदा वाचले तेव्हा माझ्या लक्षात आले की रोझाबाई एकट्याच अशा नाहीत, मीदेखील कित्येक प्रसंगी असा वागलेलो आहे.
हे टाळायचे असेल तर आपल्यातील चालकाला (Adult ला) मजबूत केले पाहिजे. रोझाबाईंचा चालक मजबूत असता तर त्या म्हणाल्या असत्या, “तुम्ही दाखवलेला ड्रेस छान आहे. पण मला मात्र हा चाॅकलेटी रंगाचा ड्रेसच घ्यायचा आहे!”
……
डॉ. रुपेश पाटकर

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments