सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्दे येथे दामिनी किरण पालव (वय – २३) या महाविद्यालयीन युवतीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे जिल्ह्यासह परिसरात खळबळ उडाली असून हत्येनंतर आरोपी फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांनी ६ पथके तैनात केली होती. यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. सायंकाळी घराकडे जात असताना वाटेत अज्ञात हल्लेखोराने तिला अडवून तिच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी संशयित आरोपीला वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथून साहिल विश्राम धुरी या तरुणाला रात्री ताब्यात घेतले असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी ही कुडाळ येथील हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात शिक्षण घेत होती. लवकरच ती कामानिमित्त मुंबई येथे जाणार होती. काल संध्याकाळी ती कुडाळ येथून बसने कडावल येथे उतरली. त्यानंतर रोजच्याप्रमाणे ती कडावल-वर्दे मार्गाने चालत आपल्या घराच्या दिशेने जात होती.
दरम्यान, कडावल-वर्दे मार्गावरील वर्दे ब्रिज येथे संशयित युवकाने तिला गाठले. आरोपीने तिला ओहळाच्या कडेला बोलवून नेले आणि तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेतील संशयित युवक हा ‘मठ’ येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे आणि त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कौशल्यपूर्वक आणि वेगाने कारवाई करत संशयिताला काल रात्रीच ताब्यात घेतले आहे.
एकतर्फी प्रेम प्रकरणातून दामिनी पालव या तरुणीची हत्या करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी साहिल धुरी याला पोलिसांनी पहाटे ४ वाजता वेंगुर्ला मठ येथे ताब्यात घेतले असून, त्याच्यावर कलम १०३/१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी ३:३० च्या सुमारास संशयित आरोपीला कुडाळ न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


