डॉ. रुपेश पाटकर : मला जेव्हापासून आठवते तेव्हापासून मी रामकृष्ण परमहंसांविषयी बाबांकडून ऐकत आलो आहे. कदाचित मला काही कळायच्या आधीपासून रामकृष्ण परमहंसांची मूर्ती पाहत आलोय. थोडा मोठा झाल्यावर आणि इतर संतांची माहिती झाल्यावर मला हा प्रश्न पडू लागला की अनेक मराठी संत असताना, विठ्ठलासारखे दैवत मराठी मुलखात असताना बाबा बंगालमधील रामकृष्ण परमहंसांकडे का आकर्षित झाले असावेत. मला आठवते आम्ही गावातील घरातून बागेतल्या घरात नुकतेच रहायला गेलो तेव्हा हा प्रश्न बाबांना मी विचारला. जी एक गोष्ट आमच्या सामाईक घरातून बाबा फार जपून घेऊन आले, ती म्हणजे रामकृष्ण परमहंसांची मूर्ती. या घटनेला आज चाळीसपेक्षा जास्त वर्षे होऊन गेलीत. पण आजही मला बैलांच्या गाडीतून दीड फुट उंचीची रामकृष्णांची मूर्ती घेऊन बसलेले बाबा आठवतात. मी जेव्हा त्यांना रामकृष्णच का आवडतात असं विचारलं, तेव्हा ते काही क्षण गप्प राहिले. जणू त्यांना देखील त्याचं कारण ठाऊक नसावं. काही क्षणानंतर ते म्हणाले, “गीतेच्या चौदाव्या अध्यायात भगवान म्हणतात, तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेले मुनी माझेच रूप होतात. त्यांना ओळखायचे कसे, हे सांगताना भगवान म्हणतात,
आत्मत्वे सम जो पाहे सोने पाषाण मृत्तिका
धैर्यवंत सुखे दु:खे स्तुति निंदा प्रियाप्रिय!!
सोने, दगड आणि माती खरोखरच ज्यांना एक वाटत होती असा अलीकडच्या काळातील अवतार म्हणजे रामकृष्ण परमहंस. संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यत सर्व संत मंडळी अशीच होती. संत मीराबाईपासून संत कबीरांपर्यंतची मंडळीदेखील अशीच होती.
पण तरीही मी रामकृष्णांकडे का ओढला गेलो, ते नाही सांगता येणार. कदाचित रामकृष्ण अगदी अलिकडचे असल्यामुळे असेल, त्यांच्याविषयी निर्विवाद माहीती उपलब्ध असल्यामुळे असेल. पण हे मात्र नक्की की त्यांना सोने आणि माती एकच वाटे. मनाची अशी तयारी आणि त्या मानसिक तयारीचे त्यांच्या वागणुकीत प्रतिबिंब दिसणे, मला त्यांच्यातले देवत्व दाखवत होते. रामकृष्णांचे फोटो तू पाहीलेस. त्यांनी कधी वेगळा पेहराव केलाय असे दिसते का? साधे धोतर हेच त्यांचे नेहमीचे कपडे. गळ्यात माळा नाही, डोक्याला टिळा नाही, डोक्यावर टोपी- पगडी वगैरे काही नाही. नियमित दाढी न करणाऱ्याची वाढते तितकी दाढी. आपण आध्यात्मिक आहोत याचे अवडंबर दाखवणारे एकही चिन्ह नाही. आणि हे त्यांच्या विचारांना अनुसरूनच होते. ते म्हणायचे, ‘मी आणि माझे’ जोपर्यंत आहे, तोपर्यंत आपण देवापासून दूर आहोत, जेव्हा ‘तो (परमेश्वर) आणि त्याचे’ हा भाव होईल, तेव्हा आपण त्याच्या मार्गावर गेलो असे समजायचे.
आपले मीपण, आपला अहंकार पुरता मरावा म्हणून लोकांची विष्ठा असलेली जागा त्यांनी स्वतःच्या हातांनी स्वच्छ केली. समाज ज्यांना अस्पृश्य म्हणतो, त्यांच्या अंगणातील कचरा ते पहाटे उठून साफ करीत.
ते कित्येक वर्षे कलकत्त्यात राहत होते, पण त्यांनी स्वतःसाठी ना कधी जमीन खरेदी केली, ना घर घेतले. त्यांचे बालपण कामारपुकूर या खेड्यातील झोपडीत गेले तर कलकत्त्यातील वास्तव्य दक्षिणेश्वरच्या काली मंदीराच्या पडवीतील खोलीत.”
बाबा त्यांच्या संध्याकाळच्या ध्यानानंतर ‘मास्तर महाशय’ या रामकृष्णांच्या अनुयायांनी लिहिलेले वचनामृत वाचून दाखवित. हे वचनामृत म्हणजे रामकृष्ण आणि त्यांचे शिष्य यांच्यातील संवाद आहेत. त्यांचे वर्णन मास्तर महाशय यांनी इतके उत्कृष्ट केले आहे की ते ऐकत असताना डोळ्यांसमोर प्रसंग उभे राहात.
एकदा त्यात त्रिगुणांचा उल्लेख आला. सत्व, रज आणि तम. तम म्हणजे आळस. काम टाळण्याची प्रवृत्ती. त्यावर माझा प्रश्न होता, ‘आपला सगळा खटाटोप काम टाळण्यासाठीच असतो ना? आताचे काम टाळता आले तर उत्तमच. पण ते बर्याचदा शक्य नसते म्हणून मग आता आपण असे काही करू पाहतो की आपले पुढचे काम टळेल. शिकायचे कशाला? शारीरिक काम टाळायलाच ना?”
बाबा म्हणाले, “तू चुकीचा अर्थ घेतलास. मी तुला डॉक्टर व्हायला सांगतोय, ते तू मजेत आयुष्य काढावे म्हणून नव्हे. तुझ्याकडून अधिक कुशल काम व्हावे म्हणून. जेणेकरून समाजपुरुषाची तू अधिक चांगली सेवा करू शकशील म्हणून. पैसेच मिळवण्यासाठी तुला सांगायचे असते तर तुला व्यापारी हो म्हटले नसते का?
हे देखील लक्षात घे की सतत कुठले ना कुठले काम करत राहणे हा कर्मयोग नव्हे. ते रजोगुण वाढल्याचे लक्षण असू शकते. काहीच न करणे म्हणजे तमोगुण. फळाच्या अपेक्षेने काम करणे म्हणजे रजोगुण. माझ्यासकट बहुतेक सर्वजण रजोगुणी असतात. फळ परमेश्वराला अर्पण करणे म्हणजे सत्वगुण. तमोगुण आणि रजोगुण यांच्यापेक्षा सत्वगुण चांगला. गीतेच्या चौदाव्या अध्यायात भगवान म्हणतात,
सत्वांतूनि निघे ज्ञान निघे लोभ रजांतूनी
अज्ञान मोह दुर्लक्ष निघती हीं तमांतुनी!
रामकृष्ण म्हणतात, सत्वगुणाला देखील सोडून द्यायचे आहे, कारण त्याचेदेखील बंधन असते. गीतेत भगवान म्हणतात,
मी सुखी आणि मी ज्ञानी शृंखला ही चि लेववी!”
” सत्वगुण देखील सोडायचा, हे कसे? मला नाही कळले,” मी म्हणालो.
त्यावर बाबा म्हणाले, “संत नामदेवांना बालपणापासून विठ्ठल दिसे. त्यांची भक्ती अशी की साक्षात भगवंत त्यांचा नैवेद्य जेवी. लाखो जन्मांच्या तपस्येने योग्यांना जे शक्य होत नाही, ते सगुण दर्शन त्यांना सहज होते आहे याचा त्यांना अभिमान वाटे. हा सात्विकतेचा अभिमान. हा अभिमान मुक्ताईच्या लक्षात आला. पंढरपुरात संतमेळा जमला असताना ती गोरोबा काकांना म्हणाली, ‘काका, मडक्यांची पारख करण्यात तुम्ही निष्णात. आमची मडकी कच्ची की पक्की ते एकदा सांगा ना तपासून.’ मग गोरोबा काकांनी मडकी तपासण्याचं थापटणे घेतले आणि एकेकाच्या डोक्यावर मारू लागले. ज्ञानोबांच्या डोक्यावर मारून म्हणाले, ‘हे पक्के!’ मग निवृत्तीनाथ, मग सोपानदादा, मग मुक्ताई. सगळ्यांची मडकी ‘पक्की’ म्हणत ते नामदेवांपाशी पोचले. त्यांच्याही डोक्यावर त्यांनी थापटणे मारले आणि म्हणाले, ‘कच्चे!’ सहाजिकच नामदेवाना राग आला. ते आपले गार्हाणे मांडायला विठ्ठलाच्या पुढ्यात गेले. पण त्यांची बाजू न घेता विठ्ठल म्हणाला, ‘तुला गुरूकृपेची आवश्यकता आहे. औंढ्या नागनाथ क्षेत्री जा. तिथे विसोबा खेचर म्हणून व्यक्ती आहे. तो तुला गुरूपदेश देईल.’ साक्षात विठ्ठलानेच सांगितले म्हटल्यावर नामदेवांपुढे गुरू शोधण्याशिवाय पर्याय उरला नाही. नामदेव औंढ्या नागनाथला गेले. त्यांनी विसोबा खेचरांचा शोध घेतला. ते एका छोट्याशा देवळात असल्याचे त्यांना कळले. ते तिथे पोचले. बघतात तर कधी स्वप्नातही न ऐकलेलं दृश्य. एक जख्खड म्हातारा त्या देवळातल्या पिंडीवर पाय ठेवून निजलाय. ज्याला साधा पाय कुठे ठेवायचा याचा विधिनिषेध नाही, तो मला उपदेश कसला करणार. काहीतरी चुकले असावे. आपण चुकीच्या माणसाकडे पोचलो असावे, असा विचार त्यांच्या मनात डोकावून गेला. ते त्या म्हातार्याला म्हणाले, ‘आजोबा, तुमचा पाय देवाच्या पिंडीवर आहे. बाजूला करा तो.’ त्यावर तो म्हातारा म्हणाला, ‘पोरा, मी खूप थकलो आहे. माझ्या अंगात जरा सुद्धा त्राण उरले नाही. तूच जरा माझा पाय ‘देव नसलेल्या ठिकाणी’ ठेवतोस का?’ नामदेवांनी त्याचा पाय बाजूला केला. तर काय आश्चर्य. त्यांनी जिथे तो ठेवला तिथे पिंडी दिसू लागली. नामदेवांनी तिथून पाय हलवून जरा बाजूला ठेवला तर तिथे देखील पिंडी दिसू लागली. नामदेवांनी त्या म्हातार्याकडे पाहिले. तो म्हातारा म्हणाला, ‘देव नाही अशी कुठे जागा आहे का?’
बस. नामदेवांना सर्वत्र घनदाट भरलेला विठ्ठल दिसू लागला. आता त्यांचा विठ्ठल फक्त पंढरपुरातील गाभाऱ्यात नव्हता, तो सर्वत्र होता. तो आता निराकार होता. निर्गुण होता. आता नामदेव सुद्धा नामदेव नव्हते, ते देखील विठ्ठल झाले होते!
अशा अवस्थेचे वर्णन गीतेच्या चौदाव्या अध्यायात करताना भगवान म्हणतात,
गुणाविण नसे कर्ता आत्मा तो त्यापलिकडे
देखणा ओळखे हे जो होय माझे चि रूप तो!!
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
